About vdnyan

I am what i am....

बक्षीस मिळालेली बाइक देऊन टाकली!

टेलिव्हिजन जगतात रिअ‍ॅलिटी शोचे पेव फुटले आहे. कोणतेही चॅनल लावा… संगीत, नृत्य, सामान्य ज्ञान, स्टँडअप कॉमेडी आणि विवाह… अशा विषयांवरील एखादा तरी रिअ‍ॅलिटी शो आपल्याला हटकून पाहायला मिळतो. या सर्वात हटके आणि व्यक्तिमत्त्वाचा कस लागणारा शो म्हणजे एमटीव्हीवरील ‘रोडीज’. या शोमध्ये जालन्याच्या सूरजने अंतिम पाचमध्ये येऊन प्रेक्षकांची मने जिंकली.
धाडसी स्टंट्स आणि नाट्यामुळे ‘रोडीज’ तरुणाईचा आवडता कार्यक्रम आहे. या शोमध्ये स्पर्धकांना अतिशय खडतर स्टंट्स करावे लागतात. म्हणूनच ‘शॉर्टकट टू हेल’ अशी या शोची टॅगलाइन आहे. त्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील हजारो तरुण धडपड करतात. या शोद्वारे आपले कलाकौशल्य जगाला दाखवावे, असे अनेक तरुणांचे स्वप्न असते. या आगळ्यावेगळ्या शोच्या आठव्या सीझनमध्ये जालन्याचे सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नादोरे यांचा मुलगा सूरज केवळ सहभागीच झाला नाही, तर त्याने आपल्या प्रतिभेची छाप सोडली. सूरजने सांगितले की, शोदरम्यान १३ स्पर्धकांना ४० दिवस वेगवेगळे स्टंट्स करायचे होते. त्यासाठी त्यांना एका शहरातून दुसºया शहरात बाइकवर प्रवास करावा लागला.  स्पर्धकांना अर्धा प्रवास भारतात आणि उरलेला प्रवास ब्राझीलमध्ये करावा लागला. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे कसलीही पटकथा व नियोजित संवाद आणि रिटेक नसलेला हा उत्स्फूर्त कार्यक्रम आहे. त्यात सूरजने अंतिम पाच स्पर्धकांत स्थान मिळवले. त्याने या शोमध्ये जिंकलेली ‘करिझ्मा’ ही एक लाख रुपयांची बाइक सहाव्या सीझनमधील स्पर्धक तमन्नाला देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने त्याला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नेमले आहे. विज्ञान शाखेचा पदवीधर असलेल्या सूरजला मालिका, मॉडेलिंगच्या आॅफर येत असल्या, तरी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून चांगले काम करण्याची त्याची इच्छा आहे. आपल्या यशात आई-वडिलांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे तो सांगतो. सूरज म्हणतो की, मराठवाड्यातील तरुणांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. गरज आहे फक्त तिला योग्य दिशा देण्याची.

ज्ञानेश्वर आर्दड
vdnyan@gmail.com